unfoldingWord 45 - फिलिप्प आणि कूशी अधिकारी
Disposisjon: Acts 6-8
Skriptnummer: 1245
Språk: Marathi
Publikum: General
Hensikt: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
Status: Approved
Skript er grunnleggende retningslinjer for oversettelse og opptak til andre språk. De bør tilpasses etter behov for å gjøre dem forståelige og relevante for hver kultur og språk. Noen termer og begreper som brukes kan trenge mer forklaring eller til og med erstattes eller utelates helt.
Skripttekst
प्रारंभीच्या मंडळींमध्ये पुढा-यांपैकी स्तेफन नावाचा एक पुढारी होता.तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो ज्ञानी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता.स्तेफनाने अनेक चमत्कार केले व लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा यास्तव अनेक प्रमाण देऊन वादविवाद करीत असे.
एके दिवशी, स्तेफन येशूविषयी शिकवण देत असतांना, विश्वास न ठेवणारे काही यहूदी त्याच्याशी वादविवाद करू लागले.त्यांना स्तेफनाचा फार राग आला व त्याच्यावर त्यांनी धार्मिक पुढा-यांसमोर खोटे दोषारोप केले.ते म्हणाले, "आम्ही त्यास मोशे व देवाविषयी अपशब्द बोलतांना ऐकले आहे!"तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास महायाजक व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
महायाजक स्तेफनास म्हणाला, "ह्या गोष्टी ख-या आहेत का?"स्तेफनाने त्यांस उत्तर देत देवाने अब्राहमापासून ते येशूपर्यंत कशा प्रकारे आश्चर्यकर्मे केली व देवाच्या लोकांनी निरंतर कशा त्याच्या आज्ञा मोडिल्या ह्याविषयी आठवण करून दिली.मग तो म्हणाला' "अहो ताठ मानेच्या व बंडखोर लोकांनो, जसे तुमचे पूर्वज नेहमी पवित्र आत्म्याचा विरोध करत होते, तसेच तुम्ही करत आहात.परंतु तुम्ही त्यांच्याहीपेक्षा वाईट केले आहे!तुम्ही मसिहास जीवे मारले आहे!"
जेव्हा धार्मिक पुढा-यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना खूप राग आला व त्यांनी आपल्या कानांवर हात ठेवून मोठ्याने ओरडले.त्यांनी स्तेफनास नगराच्या बाहेर ओढत नेले आणि त्यास दगडमार केला.
स्तेफन मरत असतांना, तो मोठ्याने ओरडला, "येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर."मग त्याने गुडघ्यावर येउन पुन्हा ओरडून म्हटले, "प्रभुजी, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस."मग त्याने प्राण सोडला.
शौल नावाचा एक तरूण मनुष्य स्तेफनाला मारणा-या लोकांशी सहमत होता व त्यास दगडमार करणा-यांची वस्त्रे तो सांभाळत होता.त्या दिवसांमध्ये, यरूशलेमेतील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांचा छळ करत होते, म्हणून शिष्य दुस-या ठिकाणी पळून गेले.पण, असे असतांनाही, जेथे कोठे ते गेले, त्यांनी येशूविषयी प्रचार केला.
फिलिप्प नावाचा येशूचा शिष्य छळामूळे यरुशलेम सोडून पळून जाणा-या विश्वासणा-यांपैकी एक होता.तो शोमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले.तेव्हा एके दिवशी, देवाच्या एक दूताने फिलिप्पास सांगितले वाळवंटातील एका विशिष्ट वाटेवर जा.तो वाटेने चालत असतांना फिलिप्पाने कूशी देशाचा एक अधिकारी आपल्या रथामध्ये बसून जात असताना पाहिला.पवित्र आत्म्याने फिलिप्पास त्या मनुष्याशी बोलण्यास सांगितले.
जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असताना ऐकले.तो वाचत होता, "त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणा-याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही.त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली व त्याचा सन्मान केला नाही.त्यांनी त्यास जीवे मारिले."
फिलिप्पाने कूशी अधिका-यास विचारले, "तुम्ही जे वाचत आहात, ते तुम्हास समजते का?कूशी माणसाने उत्तर दिले, "नाही.जोपर्यंत मला कोणी समजावून सांगत नाही, तोपर्यंत मी समजू शकत नाही.कृपया येऊन माझ्या बाजूस बसा.यशया संदेष्टा स्वतःविषयी की अन्य कोणाविषयी लिहित आहे?"
फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की संदेष्टा हे मसिहाविषयी लिहित आहे.फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत-करत एका तळ्याजवळ आले.कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा!येथे पाणी आहे!मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?"आणि त्याने सारथ्यास रथ थांबवायला सांगितले.
मग ते पाण्यामध्ये उतरले, आणि फिलिप्पाने त्या कूशी अधिका-यास बाप्तिस्मा दिला.ते पाण्यातून वर आल्यानंतर, पवित्र आत्मा फिलिप्पास दूस-या ठिकाणी घेऊन गेला तो त्या ठिकाणी लोकांना येशूविषयी सांगत राहिला.
कूशी इकडे आनंदाने आपल्या घराकडे प्रवास करू लागला, कारण त्याला येशूची ओळख झाली होती.