unfoldingWord 16 - तारणारे
Áttekintés: Judges 1-3; 6-8; 1 Samuel 1-10
Szkript száma: 1216
Nyelv: Marathi
Közönség: General
Műfaj: Bible Stories & Teac
Célja: Evangelism; Teaching
Biblia Idézet: Paraphrase
Állapot: Approved
A szkriptek alapvető irányelvek a más nyelvekre történő fordításhoz és rögzítéshez. Szükség szerint módosítani kell őket, hogy érthetőek és relevánsak legyenek az egyes kultúrák és nyelvek számára. Egyes használt kifejezések és fogalmak további magyarázatot igényelhetnek, vagy akár le is cserélhetők vagy teljesen kihagyhatók.
Szkript szövege
यहोशवाच्या मृत्युनंतर, इस्त्राएल लोकांनी देवाचे अनुकरण केले नाही, उरलेल्या कनानी लोकांना घालवून दिले नाही व देवाचे नियम पाळले नाहीत.याव्हे ख-या व जिवंत देवाची उपासना न करता इस्त्राएली लोक कनानी देवतांची पूजा करू लागले.इस्त्राएलांस राजा नव्हता, म्हणून प्रत्येक जण आपल्या दृष्टिने जे बरे ते तो करत असे.
इस्त्राएलांनी सतत देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, देवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या पुढे पराभूत करून शिक्षा दिली. ह्या शत्रूंनी इस्त्राएल लोकांची वस्तूंची चोरी केली, त्यांच्या संपत्तीचा नाश केला व त्यांच्यातील कित्येकांना मारून टाकले.अनेक वर्षानंतर देवाचा आज्ञाभंग व शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली.
मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये शांती प्रस्थापित झाली.पण नंतर इस्त्राएल लोकांना देवाचा विसर पडला व ते पुन्हा मूर्तिपूजा करू लागले.मग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकांद्वारे त्यांचा पराभव केला.
मिद्यांनी लोकांनी सात वर्षे इस्त्राएल लोकांचे अन्न - धान्य हडप केले.आता इस्त्राएली खूप भयभीत झाले व आपण मिघान्यांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुहेमध्ये राहू लागले. शेवटी आपला बचाव व्हावा म्हणून ते देवाकडे विनवणी करू लागले.
एके दिवशी गिदोन नावाचा एक इस्त्राएली मनुष्य मिद्यान्यांनी आपले धान्य चोरू नये म्हणून गुप्तपणे त्यांची झोडणी करीत होता.यहोवाचा एक दूत येऊन त्याला म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे.जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव.’’
गिदोनाच्या पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती.देवाने गिदोनास ती वेदी तोडण्यास सांगितले.परंतु गिदोनास लोकांचे भय वाटल्यामुळे तो अंधार पडण्याची वाट पाहत होता.मग त्याने ती वेदी फोडून तिचे तुकडे तुकडे केले.मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळत्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.
दुस-या दिवशी त्या वेदीचा कोणीतरी नाश केला आहे हे पाहून लोक खूप रागावले.ते गिदोनास जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण गिदोनाचा पिता त्यांस म्हणाला, ‘‘तूम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता?जर तो देव आहे तर त्याला स्वत:चे रक्षण करु द्या!’’त्याने असे म्हटल्यामुळे त्यांनी गिदोनास मारिले नाही.
मग मिद्यानी लोक पुन्हा इस्त्राएल लोकांचे धान्य चोरी करण्यासाठी आले. ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते.गिदोनाने इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले.गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.
पहिले चिन्ह म्हणून गिदोनाने जमिनीवर कपडा ठेवला व देवाला म्हटले की उद्या सकाळी जमिनीवर दहिवर न पडता फक्त कापडावरच पडावे असे होवो.देवाने तसेच केले.दुस-या रात्री, त्याने म्हटले की जमीन भिजावी पण कपडा सुकाच रहावा असे होवो.देवाने तेही केलेहया दोन्ही चिन्हांद्वारे गिदोनास खात्री पटली की देव त्याचा उपयोग इस्राएलाला मिद्यान्यांपासून सोडविण्यासाठी उपयोग करणार आहे.
32,000 इस्त्रायली सैनिक त्याच्याकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत.म्हणून युध्द करण्यास भिणा-या 22000 सैनिकांना त्याने परत पाठविले.देवाने गिदोनास सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत.म्हणून 300 सैनिकांना सोडून बाकी सर्वांना त्याने घरी पाठवून दिले.
त्या रात्री देवाने गिदोनास सांगितले,‘‘तू मिद्यान्यांच्या छावणीकडे जा व ते काय बोलतात हे ऐकून भयभित होऊ नकोस.’’म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले.त्या सैनिकाचा मित्र म्हणाला,‘‘ हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!’’गिदोनाने हे ऐकून देवाची उपासना केली.
मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली.मिद्यानी सैनिक झोपले होते त्या छावणीस त्यांनी घेरा घातला.गिदोनाच्या 300 सैनिकांनी आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यान्यांना त्यांचा प्रकाश दिसला नाही.
मग, एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला.त्यांनी आपापली रणशिंगे फूंकली व गर्जना केली,‘‘याव्हे देवाची तलवार व गिदोनाची तलवार!’’
देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले.लगेच, मिद्यान्यांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्राएली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले.त्यांनी त्यांपैकी कित्येकांना जीवे मारिले व बाकीच्यांना इस्त्राएलाच्या भूमितून घालवून दिले.त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले.देवाने इस्त्रायलाची अशा प्रकारे सुटका केली.
लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते.गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यान्यांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी कांही त्याने मागितल्या.लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले.
मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले.परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.मग देवाने इस्त्रायलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला.शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.
हया नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्त्रायली पाप करत, देव त्यांना शासन करी, ते पश्चात्ताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे.अनेक वर्षापासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.
शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला.त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता.देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणी नुसार त्यांना एक राजा दिला.